भाजप सरकारच्या काळात फारशी कामे झाली नाहीत – अशोक चव्हाण
नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सरकारच्या काळात फारशी कामे झाली नाहीत. अशीच परिस्थिती राज्यातही आले. आमचे सरकार सर्वसामन्यांच्या प्रश्नाला सोडवून न्याय देईल. एवढे नव्हे तर राज्यातील रस्तेविकासाचा आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न राहतील, अशी माहिती नवे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
नांदेडमध्ये शासकीय विश्रामगृहात चव्हाण यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती आपण यशस्वीपणे पार पाडू, असे सांगून चव्हाण म्हणाले, आपण राज्यातील मंत्री ते मुख्यमंत्री असताना सर्वच विभागांचा कार्यभार पाहिला असून, आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून धुरा सांभाळणार आहे.
राज्यातील विशेषकरून ग्रामीण भागातील दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेले रस्ते तयार करण्यासोबत एकमेकांना रस्ते जोडणे महत्त्वाचे आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सरकारमध्ये फारशी कामे झाली नाहीत. अशीच परिस्थिती राज्यात आहे. त्यामुळे माझ्याशी संबंधित असलेल्या विभागाच्या कामांवरही विशेष लक्ष देऊन ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.