हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही शिवसेना – उद्धव ठाकरे
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेच्या आमदार व जिल्हाप्रमुखांच्या बोलावलेल्या बैठकीत हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे काही लोक म्हणत आहेत. पण हिंदुत्व आणि भगवा शिवसेना मरेपर्यंत सोडणार नसल्याचे वक्तव्य यांनी केले. केली.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी बैठकीत सीएए आणि एनआरसी संदर्भात सर्व आमदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमके काय आहे हे समजावून सांगितले आहे. शिवसेना सत्तेत असल्यामुळे जनसामान्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यासाठी हे काम करा, अशा सूचना देखील आमदारांना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात शिवसेना बळकट करणासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय समनव्यक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जनतेच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्यसेवा, शिवभोजन, कर्जमुक्तीसह अनेक योजना जाहीर केल्या आहेत. तळागाळापर्यंत या योजना पोहोचायला हव्यात. हे सरकार जनतेचे असून, त्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे काम करा आणि जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांना दिल्या.
लवकरच 2 लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करणार असून, कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी मार्चपासून सुरू होऊन एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळायला हवा, यासाठी आमदारांनी स्वत: त्यांच्यांपर्यंत पोहोचायला हवे. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी आमदार तसेच प्रशासनाला दिले.
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न त्या त्या जिल्ह्यात, विभागात सुटावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. आमदार रवींद्र वायकर यांना याची मुख्य समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. या कार्यालयांच्या माध्यमातूनच सामान्य जनतेचे प्रश्न सुटायला हवेत. हे प्रश्न घेऊन त्यांना मुंबईपर्यंत पायपीट करण्याची वेळ येता कामा नये, काळजी आमदार आणि प्रशासनाने घ्यायची असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.