आंबेडकर आणि फुले जयंती संविधान, ज्ञानाचा दिवा लावून साजरी करा - शरद पवार

Thote Shubham

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी यंदाची महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एक ज्ञानासाठी आणि संविधानासाठी दिवा लावून साजरी करण्याची आवाहन केले. जे काही दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात घडले तसे महाराष्ट्रात घडू नये यासाठी शरद पवार यांनी हे आवाहन केले आहे.

 

सूचनांचे आणखी आठ दिवस तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करु. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. रुग्णांची आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. सगळ्या जातीधर्मांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचेही शरद पवार म्हणाले.


शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती येत्या काही दिवसात आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. ते म्हणाले की, आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम 8 एप्रिलला होणार आहे.

माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करा. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण ‘एक दिवस संविधानासाठी’ लावून जयंती साजरी करुया.


समाजात तेढ निर्माण होणारे मेसेज सामाजिक माध्यमांतून पसरत असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी सांगितले की, कटुता, तणाव, संशय वाढेल अशी परिस्थिती येऊ देता कामा नये. व्हॉट्सअॅपवरील मेसेज काळजी करण्यासारखे आहेत. पाचपैकी चार मेसेज खोटे असतात, त्यामधून संभ्रम निर्माण केले जातात, गैरसमज पसरवले जात आहेत. तसेच दिल्लीत जे घडले ते रोज रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.


दिल्लीतील कार्यक्रम आयोजित करायला नको होता. कार्यक्रमाला परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातही धार्मिक कार्यक्रमाची विनंती करण्यात आली होती. परंतु राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अशा कार्यक्रमांना वेळीच परवानगी नाकारली. दिल्लीत अशीच खबरदारी घेतली असती तर हा सध्याची परिस्थिती ओढावली नसती आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याची संधी मिळाली नसती.

Find Out More:

Related Articles: