महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा - राज ठाकरे

Thote Shubham
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्याचा महसूल वाढवण्यासाठी छोटी हॉटेल्स आणि पोळी भाजी केंद्र आणि वाईन्स शॉप्स उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच वाइन शॉप उघडी ठेवायला काय हरकत आहे असंही म्हटलं आहे. सोशल डिस्टनसिंग आणि खबरदारी म्हणून इतर काळजी घेऊन या गोष्टी सुरू ठेवल्या तर महसूल वाढवता येईल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


राज ठाकरेंच्या पत्रात नेमके काय?
- आज गेले ३५ दिवस महाराष्ट्र राज्यातील उपहारगृहं आणि रेस्टोरंटस पूर्णपणे ठप्प आहेत. ह्याचा फटका जसा हॉटेल व्यावसायिकांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसला आहे, तसा सामान्यांना देखील बसला आहे. आज मुंबई आणि इतर शहरांमध्ये 'हॉटेल' ही काही चैनीची गोष्ट राहिली नाही, तर ती गरज बनली आहे. 

- अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. ह्या छोट्या खानावळींची आणि हॉटेल्सची संख्या प्रचंड आहे कारण ह्या माफक दरात मिळणाऱ्या 'राईसप्लेट्स'वर राज्यातील मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. अनेकांच्या घरात जेवण बनवणारी व्यक्ती नसेल किंवा पुरेशी साधनसामुग्री पण नसेल, त्यांचा विचार आता सरकारने केला पाहिजे. हे वास्तव सरकारने स्वीकारलंच पाहिजे. 

- ह्या आजाराचा संसर्ग रोखला जावा ह्यासाठी शारीरिक अंतर राखणं गरजेचं आहे हे मान्य आहे, पण ह्या हॉटेल्समधली पार्सल सेवा सुरु करायला काय हरकत आहे? अर्थात पार्सल सेवेची सोय करताना ग्राहकांमध्ये पुरेसं शारीरिक अंतर राखलं जातंय आणि योग्य स्वच्छता राखली जात आहे हे बघणं हे हॉटेल्स मालकांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी बजावलंच पाहिजे. ह्यातून पार मृत झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात धुगधुगी तरी निर्माण होईल. 

- ह्याच जोडीला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. 

जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे? 

- 'वाईन शॉप्स' सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल. 

Find Out More:

Related Articles: