विराटनं नाकारलेल्या ‘या’ धमाकेदार खेळाडूला रोहित देणार संधी
भारत आणि बांगला देश यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज संध्याकाळी नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडीयम वर खेळला जाणार आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ही लढत दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे. विराट कोहलीने विश्रांती घेतल्यानंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्माकडे आली आहेत. शिखर धवन पुन्हा संघात परतला आहे. विजय हजारे करंडकमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याला सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. मधल्या फळीत लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कृणाल पंड्या असणार आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शिवम दुबे याला पदार्पणाची संधी असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले आहेत.
भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यात अनुभवाचा अभाव आहे. प्रामुख्याने यजुर्वेद्र चहल, खलील अहमद, दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर भारताची मदार असेल. परंतु मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे,शार्दुल ठाकूर आणि राहुल चहर हेसुद्धा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध आहेत.
अष्टपैलू खेळाडू असलेल्या शिवम दुबेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या टीमने 5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, 2019 च्या आयपीएलमध्ये त्याला फक्त 4 सामन्यात संधी देण्यात आली. त्यानंतर त्याला संघातून बाहेरं बसवलं होतं. त्याला पुन्हा संधी मिळाली नाही.