टी-२०मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम विराटच्या नावे
हैदराबाद : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ६ गडी राखत दणदणीत विजय मिळविला. वेस्ट इंडिजच्या २०८ धावांचा पाठलाग भारताने १८.४ षटकांमध्ये ४ गडी गमावून केला. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ धावांची तर केएल राहुलने ६२ धावांची खेळी केली. टी-२० क्रिकेटमधला विराटचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. टी-२० क्रिकेटमधील विराटचे हे २३वे अर्धशतक होते. विराटला या कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
टी-२०मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. १२व्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये विराटने सामनावीर पुरस्कार मिळवला. टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनेही १२वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. आता रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. विराटला या मॅचमध्ये मोहम्मद नबीच्या पुढे जायची संधी आहे.
विराट कोहलीने ७३ टी-२० सामन्याच्या डावात ६८ इनिंगमध्ये १३६.७ च्या स्ट्राईक रेट आणि ५१.९२च्या सरासरीने २,५४४ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे.