जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने केला नाही तो पराक्रम केलाय हिटमॅन रोहित शर्माने!
मुंबई काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने 34 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे त्याने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 षटकार मारण्याचा टप्पा ओलांडला आहे. त्याने 2019 या वर्षात आत्तापर्यंत 44 सामन्यात 72 षटकार मारले आहेत.
रोहित हा 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे 2017 आणि 2018 मध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितनेच सर्वाधिक षटकार मारले होते. त्याने 2017 मध्ये 65 षटकार तर 2018 मध्ये 74 षटकार मारले होते. रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 70 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा सध्यातरी जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. खास गोष्ट म्हणजे त्याने हा कारनामा 2018 आणि 2019 असे सलग 2 वर्षे केला आहे.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे रोहितने जानेवारी 2016 पासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 257 षटकार मारले आहेत. या कालावधीत अन्य कोणत्याही फलंदाजाला 150पेक्षा अधिक षटकार मारता आलेले नाहीत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
74 षटकार – रोहित शर्मा – 2018
72 षटकार – रोहित शर्मा – 2019
65 षटकार – रोहित शर्मा – 2017
63 षटकार – एबी डिविलियर्स – 2015
60 षटकार – ओएन मॉर्गन – 2019
59 षटकार – ख्रिस गेल – 2012