‘द वॉल’च्या मुलाचा डबल धमाका
नवी दिल्ली – ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे.
समित द्रविडने कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत द्विशतक झळकावले आहे. समित द्रविडने धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना २०१ धावांची खेळी केली. समितने २५६ चेंडूत २२ चौकारांसह २०१ धावा केल्या.
भले हा सामना अनिर्णित सुटला असला तरीही अष्टपैलू कामगिरी करत समित द्रविडने सर्वांची वाहवा मिळवली आहे. समितने दुसऱ्या डावातही नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत २०१८ साली समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे याआधीही समितने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असल्यामुळे समित भविष्यकाळात आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.