
धावांचा डोंगर उभारुनही भारताचा धक्कादायक पराभव
हॅमिल्टन – यजमान न्यूझीलंडने भारताविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात धक्कादायक विजय नोंदवला. न्यूझीलंडने हा सामना रॉस टेलरचे नाबाद शतक आणि कर्णधार टॉम लाथम-हेन्री निकोलस या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ गडी राखून जिंकला. भारताने दिलेले ३४८ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्धशतकी सलामी दिली. संघाची धावसंख्या ८५ असताना गुप्टील (३२) बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला केदार जाधवकरवी झेलबाद केले. टॉम ब्लंडल आणि हेन्रीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली.
ब्लंडलला माघारी धाडत भारताला कुलदीप यादवने दुसरे यश मिळवून दिले. हेन्री-टेलर या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरला. यादरम्यान, हेन्रीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो व्यक्तिगत ७८ धावांवर असताना त्याला विराटने धावबाद केले.
हेन्री बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि कर्णधार टॉम लाथम यांनी शतकी भागिदारी करत संघाला तिनशे पार केले. कुलदीपला मोठा फटका मारण्याच्या नादात लाथम झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. लॉथम बाद झाल्यानंतर टेलरने आपले शतक पूर्ण केले.
जिमी नीशमला बाद करत शमीने न्यूझीलंडला ५ वा धक्का दिला. नीशम बाद पाठोपाठ ग्रँडहोम आल्या पावली माघारी परतला. विराटने त्याला धावबाद केल्यानंतर टेलरने कोणतेही नुकसान न होऊ देता मिचेल सँटनरसह संघाला विजय मिळवून दिला. रॉस टेलरने ८४ चेंडूत नाबाद १०९ धावांची खेळी केली. या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.