
क्रिकेटच्या देवाने जिंकला क्रीडा विश्वातील ऑस्कर
नवी दिल्ली – कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने २०११ साली विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज कुलसेखराच्या गोलंदाजीवर षटकार लगावत भारताला विश्वविजेता बनवले. सचिन तेंडुलकरचे भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न साकार झाले होते. संघातील खेळाडूंनी २ एप्रिल २०११ रोजी विश्वचषक विजयानंतर सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती.
सचिन यादरम्यान आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधीला पुरस्कार मिळाला आहे. ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ असे शीर्षक त्या क्षणाला देण्यात आले आहे.
सचिनच्या त्या क्षणाला क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे. 2000-2020 या २० वर्षांमध्ये क्रीडा विश्वातील हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये सोमवारी लॉरियस पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याला सचिन तेंडुलकरने स्वत: उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.
विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेतून या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. सचिनने त्या सर्वांना मागे टाकत हा बहुमान आपल्या नावे केला आहे. बर्लिनमध्ये सचिनला हा चषक देऊन टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सन्मानित केले.