ऑल इंग्लंड बॅडमिंटन – सिंधूचे आव्हान संपुष्टात
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची खेळाडू पीव्ही सिंधू हिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून पराभव स्वीकारावा लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची फुलराणी सायना नेहवाल पहिल्या फेरीतच पराभूत झाल्याने भारताच्या सर्व आशा सिंधूवर होत्या. तिला नोझोमीने २१-११, १५-२१, १३-२१ असे तीन सेटमध्ये पराभूत केले.
वास्तविक या सामन्यात पहिला सेट सिंधूने जिंकून चांगली सुरवात केली होती. पण दुसऱ्या सेटपासून नोझोमीने आक्रमक खेळ केला आणि सिंधू ला जखडविले. अर्थात दुसरा सेट नोझोमीने जिंकला पण पहिला सेट सिंधूच्या हातात होता त्यामुळे तिसऱ्या सेट मध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढली होती.
पण तिसऱ्या सेट मध्येही नोझोमी आक्रमक राहिली आणि सिंधूला पराभवास सामोरे जावे लागले. सिंधू आणि सायनाचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद यांनी ही स्पर्धा २००३ मध्ये जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीय खेळाडू ही स्पर्धा जिंकू शकलेला नाही.